“Winner winner chicken dinner” नक्की कोठे आणि काय घडला हा प्रकार..?

0

काल बरेच दिवसा पासून ज्या चित्रपटाची वाट पाहत होतो तो उरी च्या घटनेवर ( सर्जिकल स्ट्राईक) आधारित URI चित्रपट पाहायला गेलो. मुळातच कल्पना होतीच की चित्रपट काय कमालीचा असणार आहे व त्याची कथा काय असणार आहे तरी सुधा शेवटपर्यंत खेळवून ठेवण्याची क्षमता या चित्रपटात आहे परंतु एका घटनेने मला फार खोल विचारात पाडले….

चित्रपट अत्यंत उस्तुक्तेच्या शिगेला पोहचला असताना क्लायमॅक्स मध्ये हल्ल्याच्या आदल्या रात्री पंतप्रधान सर्व जवानांना सुखरूप परत आणण्याचे आश्वासन टीम कमांडर ला मागतात तेव्हा अत्यंत आत्म विश्वासाने कमांडर सहज उत्तर देतात की 30 तारखेला रात्री हल्यानंतर आम्ही सर्व जण आपल्यासोबत डिनर करू इच्छितो.

त्यांच्यातील हा संवाद मनात घर करून जाणार तितक्यात पब्लिक मधून एक आवाज आला “विनर विनर चिकन डिनर” आणि बऱ्या पैकी हशा पिकला…. अर्थात याचा अर्थ ज्यांच्या साठी हा लेख आहे त्यांना समजलाच असेल पण त्या कमेंट मुळे साहजिकच त्या मुलाच्या बौद्धिक कुवतेची कीव आलीच….परंतु आजकालच्या तरुणांच्या फुस्क्या काल्पनिक ध्येयाच्या पातळीची देखील नकळत जाणीव झाली , म्हणजे चित्रपटाच्या अशा क्षणाला जिथे उर फाटून आला पाहिजे ति थे उलट त्यांची तुलना एखाद्या गेमशी व्हावी ही गोष्ट फारच विचारात टाकणारी होती माझ्यासाठी.

एकीकडे राष्ट्र प्रेमामुळे शौर्याच्या आणि ध्येयाच्या परमोच्च शिखरावर पोहचलेला एक तरुण जवान सैनिक दिसत होता आणि एका बाजूला काल्पनिक बोथट भावनांच्या ट्रोल, प्रँक आणि ट्रेण्ड च्या फुस्क्या विश्वात रुतत चाललेला एक पब्जी वेडा तरुण दिसत होता. निश्चितच मी सुद्धा कधीकाळी हा गेम खेळला आहे परंतु ज्या क्षणाला जाणवलं हा खेळ माझ्याशी खेळतोय त्या क्षणी त्यापासून मी दूर झालो… हे माझे नशीब परंतु आज भारतात हा गेम गेम राहिला नसून नकळत संस्कृतीच बनू लागला आहे नकळत एक मोठी समस्या बनू लागला आहे , अनेक जण या पायी मानसिक आजार होऊन बिछान्यात खिळले आहेत , सरकार वर यावरती बंदी घालावी अशी वेळ येऊन ठेपली आहे ( ज्या देशात बनला आहे तिकडे सुध्दा अस काही झालं नसेल) .

प्रश्न फक्त या गेम पुरता मर्यादित नाही परंतु सबवे झाला कँडी क्रश झाला पोकेमोन झाला आणि आता पब्जि… एकामागून एक गेम भारतावर आदळत च आहेत जे मला सध्या शत्रू राष्ट्रांकडून डागल्या क्षेपणास्त्र पेक्षा भयानक वाटू लागले आहेत, कारण शस्त्रे फक्त मनुष्यहानी करतील परंतु हे गेम्स जर भारतातील महासत्तेकडे चाललेल्या तरुणांचे ध्येय आणि शौऱ्यच संपवून टाकत असतील, त्यांना त्यांच्या ध्येया पासून परावृत्त करीत असतील , त्यांचे राष्ट्रप्रेम इतके बोथट करीत असतील तर या पेक्षा वाईट अजून काय असू शकते….????

आणि खरेच असे झाले तर शत्रू राष्ट्रासाठी कोणतीही लढाई न करता मिळवलेला जगातील तो सर्वात मोठा विजय असेल हे नक्की.घडलेली गोष्ट म्हणाल तर फारच शुल्लक गोष्ट होती पण त्या कारणाने माझ्या मनात आलेली गोष्ट भयानक आणि विचार करायला लावणारी आहे. तुम्हाला पण तितकी महत्वाची वाटली तर बघा घोळवून आपल्या मनात. लेखनसिमा – सत्यजित भोसले.

Share.

Leave A Reply