पुलवामा हल्ला..! ती एक चुक आज भारताला महागात पडली.

0

१९९९ मध्ये कंदहार विमान अपहरण केल्यानंतर सुटका करण्यात आलेला दहशतवादी मौलाना मसूद अजहर हा भारताची आता डोकेदुखी ठरू लागलाय. सातत्यानं दहशतवादी कारवाया करणाऱ्या मसूदच्या कारवाया अजूनही थांबलेल्या नाहीत. गुरूवारी काश्मीर खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी मसूद प्रमुख असलेल्या जैश-ए-महमंद या संघटनेनं घेतलेली आहे. त्यामुळं मसूदला १९९९ मध्ये सोडण्याची कृती आता भारताला महागात पडत असल्याची टीका नेटिझन्सनी सोशल मीडियावर करायला सुरूवात केली आहे. १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या IC-814 या विमानाचं नेपाळमधील काठमांडू इथून अपहरण करण्यात आलं होतं.

त्यानंतर ते विमान अमृतसर, लाहोर आणि दुबईमार्गे अफगाणिस्तानच्या कंदहार विमानतळावन नेण्यात आलं. केवळ पाच दहशतवाद्यांनी १७८ प्रवाशांचं अपहरण केलं होतं. या प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात मौलाना मसूद अजहर, मुश्ताक अहमद जरगर आणि अहमद उमर सईद शेख या तीन दहशतवाद्यांची सुटका तत्कालीन केंद्र सरकारला करावी लागली होती. दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली या तिघांना अटक करून श्रीनगरच्या तुरूंगात ठेवण्यात आलं होतं. या संपूर्ण विमान अपहरणाचा मास्टरमाईंड हा मसूदचा भाऊ अब्दुल रऊफ असगर हा होता.

भारतीय तुरूंगातून सुटल्यानंतर मौलान मसूद अजहर अजूनच आक्रमक झाला. भारतात दहशतवादी कारवाया करण्याच्या उद्देशानं त्यानं हरकत-उल-अंसार ही दहशतवादी संघटना सोडली. २००० मध्ये मसूदनं जैश-ए-महमंद या नव्या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. त्यानंतर हरकत-उल-मुजाहिदीन आणि हरकत-उल-अंसार या दोन्ही संघटना जैश-ए-महमंद या संघटनेत सामील झाल्या.

भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड आहे मौलाना मसूद अजहर २००१ मध्ये भारताच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ला असो की पठानकोटचा हल्ला असो या सर्वांचा मास्टरमाईंड हा मौलाना मसूद अजहरच होता, हे या हल्ल्यानंतर समोर आलं. संसदेवरील हल्ल्यात ९ सुरक्षा रक्षक शहीद झाले होते तर ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. भारतानं त्याचवेळी या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या मसूद अजहरला भारताकडे सुपूर्द करण्याची मागणी पाकिस्तानकडे केली होती. मात्र, पाकिस्ताननं पुरेसे पुरावे नसल्यानं मसूदचं प्रत्यार्पण करण्यास नकार दिला होता. त्यानंतर सातत्यानं मसूदच्या भारताविरोधातील दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. पठानकोटच्या दहशतवादी हल्ल्याचा कट हा पाकिस्तानमध्येच रचण्यात आला होता. त्याचा मास्टरमाईंडही मसूद अजहरच होता. त्यासोबतच त्याचा भाऊ अब्दुल रऊफ असगर, मौलाना अशफाक अहमद, हाफिज अब्दुल शकूर आणि कासिम जान या सगळ्यांनी मिळून हा कट रचला होता. त्यासंदर्भातले पुरावे देऊनही पाकिस्ताननं मौलाना मसूद अजहरला भारताच्या ताब्यात दिलेलं नाही.

१९९९ मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरणामध्ये मौलाना मसूद अजहरसह त्याच्या दोन साथीदारांची केलेल्या सुटकेनं अनेक निष्पाप जीव घेतलेले आहेत. त्यामुळं भविष्यातील हानी टाळण्यासाठी भारतानं मसूद अजहरच्या प्रत्यार्पणासाठी पािकस्तानच्या सरकारवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आणण्याची गरज असल्याची मागणीही नेटिझन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून करू लागले आहेत.

Share.

Leave A Reply