मुळशी पॅटर्न चित्रपटामागील खरी कहाणी…!

0

कुटुंबाच्या मुळावर येणारा मुळशी पॅटर्न सिनेमातला राहुल अशाच बापाच्या पोटचा पोर. आधीच्या पिढीच्या अविचारी वर्तनाने गेलेली जमीन, त्यातून होणारा अन्याय आणि नैराश्य यातून राहुलच्या पिढीला जे काही सोसावं लागतं त्याचा हा मुळशी पॅटर्न बनला आहे. एक किस्सा आठवला… एकदा पंतांनी एका कॉलेजला भेट दिली. कॉलेजमध्ये मुलांशी संवाद साधला. तिथे त्यांनी मुलांना प्रश्न विचारला. पंत म्हणाले, ‘जर मी तुम्हाला एक कोटी रुपये दिले. तर तुम्ही त्याचं काय कराल? ‘मुलं एकदम वेडी झाली. काहींनी सांगितलं, आम्ही घर, गाडी घेऊ. काही म्हणाले, कपडे, गाड्या यांसह महागडे मोबाईल, लॅपटॉप आदी गोष्टी घेऊ.मुली म्हणाल्या, दागिने घेऊ. तर काही मुलं म्हणाली, आम्ही सगळे पैसे बँकेत ठेवू आणि मिळणारं व्याज खाऊ. यात एक मुलगा मात्र शांत होता. पंत त्याच्यापाशी आले आणि म्हणाले, ‘काय रे, तुला नकोत का एक कोटी?’ यावर तो मुलगा म्हणतो, ‘पैसे कुणाला नकोयत सर. पण मिळालेल्या एक कोटीचे मी पुढे दोन कोटी कसे होतील हे पाहीन.’

आता हा किस्सा म्हणून ठिक आहे. पण पुन्हा एकदा हा किस्सा वाचून लक्षात येतं, की अचानक जर कुणी भली मोठी रक्कम हाती देऊ केली, तर या रकमेचं करायचं काय हे भल्याभल्यांना कळत नाही. कारण प्रत्येकाच्या मनात, डोक्यात उद्याचा विचार असतोच असं नाही. आलेला पैसा भसाभस वापरून वर्तमानी आयुष्य सुकर करायचं आणि पैसा संपला की पुरतं नागवं व्हायचं, असं जीणं अनेकांच्या नशिबी आलं. अशी एक पिढी नव्हे, तर त्यापुढच्या पिढीलाही ही झळ लागली. त्या हालअपेष्टांची आणि पर्यायाने स्वीकारलेल्या गुन्हेगारी जगताची अशीच एक कहाणी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मांडली आहे, आपल्या मुळशी पॅटर्न या सिनेमातून.

timesofindia.indiatimes.com

ही गोष्ट आजची असली तरी त्याला संदर्भ आहे तो १९९१ चा. शहरांना जागा कमी पडू लागल्यावर शहरालगत असलेल्या तालुक्यातल्या गावांना शहरांनी गिळायला सुरूवात केली. शेजारच्या गावातल्या जमिनींची मागणी वाढली. मागणी वाढल्यावर किंमत वाढली. कार्पोरेट कंपन्यांनी मिळेल त्या किमतीला जमिनी घ्यायला सुरूवात केली. शेती करून वर्षाकाठी पोट भरणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात एका रात्रीत कोट्यवधी रूपयांची रोकड आली. शेतकरी सुखावला. पण मिळालेल्या पैशाचं नेमकं काय करायचं हे त्याला कळेना. हातातल्या पैशात बंगला-गाडी आली, चैन आली. विलासी जगणं आलं आणि एक दिवस पैसा संपला आणि आभाळ फाटलं. पूर्वी कसायला जमीन होती. पण आता तीही नसल्यानं मिळेल ते काम करण्याशिवाय पर्याय उरला नाही. मानही गेला आणि धनही गेलं. सिनेमातला राहुल अशाच बापाच्या पोटचा पोर. आधीच्या पिढीच्या अविचारी वर्तनाने गेलेली जमीन, त्यातून होणारा अन्याय आणि नैराश्य यातून राहुलच्या पिढीला जे काही सोसावं लागतं त्याचा हा मुळशी पॅटर्न बनला आहे. या चित्रपटाची गोष्ट काल्पनिक असली, तरी यातले अनेक किस्से आपण वर्तमानपत्रात वाचलेले आहेत. त्यामुळे हा चित्रपट वास्तवदर्शी झाला आहे. कथा चित्रपटाला पोषक आहे. त्याची पटकथा लिहितानाही तो नॉन लिनिअर फॉरमॅटमध्ये असल्यामुळे गोष्ट खिळवून ठेवते. पटकथेचा पूर्वार्ध कमाल कसून बांधला आहे. यात सर्व व्यक्तिरेखा, त्यांचा आवाका लक्षात येतो. एकूणात एकामागोमाग येणारे प्रसंग पाहतानाही रंगत येते. मध्यांतराचा पॉइंटही तितकाच उत्कंठावर्धक. त्यामुळे उत्तरार्धाकडे लक्ष लागून राहणं स्वाभाविक होतं. इथे मात्र थोडा चित्रपट मंदावतो.

punerispeaks.com

चित्रपटाच्या उत्तरार्धात गॅंगवॉर आणि हाणामारीचा काहीसा अतिरेक झाल्यासारखा वाटतो. त्याच्यामध्ये भावनिक गुंतागुंत नाही अशातला भाग नाही. पण उत्तरार्धात सिनेमा टप्प्याटप्प्याने पुढे जाताना आणखी काही दृश्य प्रसंग असायला हवे होते असं वाटून जातं. एक नक्की, की या सिनेमात केवळ हिंसा नाही. तर त्यामध्ये शेतकऱ्यांची आजची स्थिती, त्यांना लुटणारे दलाल, पदरी येणारं नैराश्य.. आदी बाबी आहेत. शिवाय, गुन्हेगारी वृत्तीचं समर्थनही हा चित्रपट करत नाही. म्हणूनच, एकीकडे राहुल, पिट्या यांच्यासारखे भाई असताना, यांची केस घेणारा पोलीसही मुळशीचाच दाखवला आहे. यातून दिग्दर्शक आपल्यासमोर दोन पर्याय उभे करतो. निवडायचा निर्णय सर्वस्वी आपला.

marathistars.com

संवादांबाबती भाषा ओघवती असल्यामुळे ते सुटसुटीत झाले आहेत. ‘माझं आभाळ झुकलं’, ‘शेती विकायची नाही राखायची’ असे काही प्रसंग कडक झाले आहेत. यातली व्यक्तिरेखा निवडही अचूक. विशेष कौतुक करायला हवं ते ओम भूतकरचं. त्याच्यासह या सिनेमात उपेंद्र लिमये, मोहन जोशी, अजय पूरकर, प्रवीण तरडे आदींच्या भूमिका आहेत. त्या सर्वांनीच यात उत्तम काम केलंय. महेश लिमये यांचं छायांकन, नरेंद्र भिडे यांचं पार्श्वसंगीत, संकलन आदी बाबी योग्य. यात संगीतामध्ये आरारारा हे गाणं सध्या लोकप्रिय झालं आहेच. पण त्यातलं आभाळाला.. हे गाणं ऐकायला छान वाटत असलं, तरी उत्तरार्धात ते आल्यानं चित्रपटाचा वेग मंदावतो. अर्थात, पिक्चर बिक्चरमध्ये प्रवीण तरडे आणि महेश लिमये यांनी याबाबत आपली बाजूही माडंली आहे. या चित्रपटाची गोष्ट भावनिक दृष्टया आपल्याशी जोडली जाते. पण ती सांगताना त्यात उत्तरार्धात आणखी काही प्रसंग असायला हवे होते असं वाटून जातं. पण इतर सर्व पातळ्यांवर हा चित्रपट यशस्वी ठरतो. कोणताही अविर्भाव न आणता मेसेज देतो. म्हणून पिक्चरबिक्चरमध्ये आपण या चित्रपटाला देतो आहोत, साडेतीन स्टार्स. सरतेशेवटी अशी हुरहूर मात्र वाटत राहते, की पैसा देताना तो खर्च कसा करायचा याचीही थोडी सोय केली असती तर कुटुंबाची अशी हलाखीची अवस्था झाली नसती. असो हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पहा.

Share.

Leave A Reply