आम्ही नोकऱ्या करतो, राजकारण नाही, पोलिस आणि राजकीय नेत्यांमध्ये वाद…!

0

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीवेळी महापालिका चौकात सोडण्यावरून आमदार हसन मुश्रीफ व करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. साहेब, ‘आम्ही नोकऱ्या करतो, राजकारण नाही. गडचिरोलीला नव्हे तर घरी जाईन, पण तुम्ही वर्दीवर यायचं नाही, घरला जा’, अशा शब्दात गुरव यांनी आ. मुश्रीफ यांना सुनावले. यावेळी आमदार सतेज पाटील यांचाही पोलिसांशी वाद झाला. या प्रकरणाने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर एकच वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी आ. मुश्रीफ यांच्याशी वाद घालणाऱ्या गुरव यांचा दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी घोषणा देऊन धिक्कार केला. महापौर-उपमहापौर निवडीत काँग्रेस आघाडीच्या काही नगरसेवकांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार व त्यातून या निवडीत निर्माण झालेली चुरस यामुळे महापालिका परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

सभागृहात किंवा चौकात जाणाऱ्या प्रत्येकाला ओळखपत्र असल्याशिवाय सोडायचे नाही असे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल यांनी दिले होते. त्याच्या अंमलबजावणीसाठी गुरव यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, वसंत बाबर यांच्यासह मोठा फौजफाटा प्रवेशद्वारावर होता. साधारण साडेदहाच्या सुमारास एका खाजगी आराम बसमधून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे फेटे बांधून आगमन झाले. या बसच्या पुढे आ. पाटील व आ. मुश्रीफ यांच्या गाड्या होत्या. या दोघांच्या गाडीत महापौर, उपमहापौर पदाचे उमेदवार बसले होते. नगरसेवकांनी ओळखपत्र दाखवून आत जाण्याची सुचना पोलिसांनी केली.

inmarathi.in

त्याचवेळी मुश्रीफ व आ. पाटील हेही आत जाण्यासाठी निघाले. त्यावेळी गुरव व इतर पोलिसांनी त्यांना रोखून तुम्हाला आत जाता येणार नाही असे सांगतिले. यावरून सुरूवातील या दोन्हीही आमदारांचा पोलिसांशी जोरदार वाद झाला.

त्यातच आ. मुश्रीफ यांनी तुम्हाला गडचिरोली दाखवायला पाहीजे असा टोला गुरव यांना लगावला. त्यामुळे संतप्त झालेल्या गुरव यांनी मुश्रीफ यांच्या दिशेने जाऊन साहेब, ‘गडचिरोली नाही तर घरी जायची तयारी आहे. तुम्ही आमच्या वर्दीवर यायचे नाही, आम्ही नोकऱ्या करतो, राजकारण नाही, तुम्ही घरला जा’, अशा शब्दात गुरव यांनी मुश्रीफ यांचा समाचार घेतला. यामुळे प्रवेशद्वारावरच तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याच दरम्यान आ. पाटील यांचाही पोलिसांशी वाद झाला. हा वाद सुरू असतानाच विरोधी आघाडीचे नगरसेवक आले, त्यांच्यासाठीही हा नियम लावा, असे आ. पाटील यांनी पोलिसांना सांगितले. तोपर्यंत पोलीस निरीक्षक सावंत यांनी मुश्रीफ यांना शांत करत बाजूला नेले. त्यानंतर आ. मुश्रीफ व आ. पाटील महापालिके बाहेरच एका बाजूला थांबून राहीले.

Share.

Leave A Reply